Sharad Pawar’s birthday; शरद पवारांचा राजकीय प्रवास उलगडणारे काही महत्त्वाच्या गोष्टी !
महाराष्ट्राच्या व देशातील राजकारणातील चर्चेतील नाव म्हणजे शरदचंद्र पवार. राजकारणातील भाकरी फिरवणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. ६ दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात सक्रिय राहूनही त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. लोकांशी जवळीक, परिस्थितीनुसार जलद निर्णय आणि तडजोडीची राजकीय कला हे शरद पवार यांच्या प्रवासाचे खास वैशिष्ट्य आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८५ वा वाढदिवस आहे. ८४ वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळा आकार दिला आहे. चला तर मग पाहूयात शरद पवार यांचा राजकीय प्रवास कसा आहे.
पवारांचा अल्प परिचय :
१२ डिसेंबर १९४० साली शरद पवार यांचा जन्म बारामतीत झाला. शरद पवार हे देशातील सर्वात जाणकार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्द १९५६ साली विद्यार्थी नेता म्हणून सुरू झाली. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. आणि त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. त्याच काळात विद्यार्थी संघटनेच्या एका कार्यक्रमाला तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात शरद पवार भाषणामुळे मुख्यमंत्री देखील त्यांच्याकडून प्रभावीत झाले. त्यांना सक्रिय राजकारणात येण्यासाठी खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले. यशवंतरावांच्या सांगण्यावरुनच पवारांनी पुढे युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१ आणि १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. अगदी वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते सभाही झाले. काँग्रेसचे १२ आमदार फोडून शरद पवार पहिल्यांदा १९७८ ला मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी वसंतराव नाईक यांचे सरकार पाडले.
देशाच्या राजकारणात उतरले :
१९९५ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली. मात्र त्यानंतर १९९६ ला शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक जिंकत देशाच्या राजकारणात उतरले. मात्र त्यानंतर सोनिया गांधी यांना पंतप्रधान.पदाच्या उमेदवारीवरून शरद पवार यांचे काँग्रेसमध्ये मतभेद झाले. आणि शरद पवार यांनी १९९९ साली आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनवला. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकी नंतर शरद पवार यांनी काँग्रेस सोबत राज्यात आघाडीचे सरकारने सत्तेत आले. यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले.
१९८५ साली शरद पवार हे लोकसभेवर गेले. १९८५ साली विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली. मात्र त्यांनी लोकसभा सदयत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. १९८७ साली शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे केला. त्यावेळी १९८८ साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. गांधी यांच्या हत्त्येनंतर पंतप्रधानपदी नरसिंह राव विराजमान झाले. नरसिंह रावांनी पवारांना केन्द्रीय मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून नेमले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक यांना संधी देण्यात आली.
आघाडी सरकारमध्ये सामील:
२००४ साली केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी होती. 2009 साली केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण ह्या खात्यांची धुरा देण्यात आली. २०१९ साली शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवत भाजपला आव्हान दिले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे हे सरकार पडले.
सातार्याची निवडणूक ठरली होती राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची ;
२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच शरद पवार यांच्यासाठीही प्रतिष्ठेची ठरली होती. भाजपाकडून उदयनराजे यांना तिकीट जाहीर झालं. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवले. श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीची सभा साताऱ्यात होणारी होती. सभेचा दिवस ठरला १८ ऑ्क्टोबर २०१९.
ऐतिहासिक सभा ठरली !
शरद पवारांच्या भरपावसातील या सभेनंतर हे भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरलं झालं. ७९ वर्षांच्या शरद पवारांच्या उत्साहाची आणि त्यांनी उदयनराजेंवर केलेल्या टीकेबद्दल चर्चा होवू लागली. शरद पवारांच्या भरपावसातील भाषणासारखी मतही अशी भरघोस मिळणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगु लागल्या. सोशल मीडियावर ‘मिम्स’चा पाऊस पडू लागला. परिणामी या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजेंचा पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटीलमताधिक्याने लोकसभेवर निवडून आले. शरद पवारांचं हे भाषण त्यांच्या पायाला जखम असताना भर पावसात केलं होतं. राजकीय वर्तुळात बोललं जावू लागलं शरद पवारांची ही ऐतिहासिक सभा उदयनराजेंना जखम देवून गेली. या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना 6,36,620 मते (51.04%) तर उदयनराजे यांना 5,48,903 मते (44.01%) मिळाली.
पाऊस आणि राजकीय सभा ट्रेंड !
भरपावसातील शरद पवारांच भाषण एवढं गाजलं की, एखादा नेता प्रचारावेळी पावसात भिजला तरी शरद पवारांच्या साताऱ्यातील भाषणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मध्यंतरी भारत जोडो यात्रेदरम्यानच दक्षिण भारतातील राहुल गांधी यांचही पावसातील भाषण खूप गाजलं. फक्त शरद पवारांनीच पावसात सभा घेतली का? तर असे नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांच्या पावसातील सभा गाजल्या आहेत. त्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे, अटलबिहारी वाजपेयी यांच लाल किल्यावरील २००३ मधील स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेलं भाषण, लाल कृष्ण अडवाणी यांनीही जन चेतना यात्रे दरम्यान पावसात केलेले भाषण गाजले होते.
तर असा आहे शरद पवार यांचा राजकीय प्रवास. आजही न थकता शरद पवार राजकारणात सक्रिय आहेत. अनेक आवाहन आले तरी ते खचले नाही. राष्ट्रवादीचे दोन गट झाले तरी सुद्धा त्यांनी जिद्द सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– आकांक्षा देशमुख
– संवाद सेतू