Samvad Setu Media

[gtranslate]

National Pollution Control Day 2025; to spread awareness about the problem caused by increasing pollution.

National Pollution Control Day 2025; to spread awareness about the problem caused by increasing pollution.

National Pollution Control Day 2025

National Pollution Control Day 2025: Date, History, Significance, Objectives and Key Facts

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस; स्वच्छ भारतासाठी एक पाऊल पुढे !

भारताचा नकाशा पाहिला, की शहरांचे चमकणारे दिवे आणि उद्योगांच्या उंच चिमण्या, उंच इमारती आपल्याला दिसतात. पण या उजेडांच्या मागे एक गडद सावली दडलेली आहे, ते म्हणजे प्रदूषण. हाच विषय लोकांच्या मनात कायम जागा राहावा आणि त्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी २ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो.

मात्र हे वाढत प्रदूषण चिंतेचा विषय ठरत आहे. प्रदूषणाची ही वाढती सावली खरंच चिंता वाढवणारी आहे. जणू आकाशाने आपले निळे वस्त्र दुमडून एखादे राखाडी कापड घेतल्यासारखे आहे. त्यामुळे आजच्या लेखमध्ये आपण पाहूयात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस का साजरा केला जाती व प्रदेशांवर नियंत्रण कसे ठेवले पाहिजे.

आज शहरांतील हवा धुरकट, नद्यांचा प्रवाह बदललेला, आणि माती थकलेली दिसते. यामुळे मानवी आरोग्यापासून शेतीपर्यंत सगळ्यावर परिणाम होतो. वाहने, उद्योग, प्लास्टिक, रसायने, जंगलतोड, अनियंत्रित शहरीकरण हे सर्व मिळून वातावरणावर ताण आणत आहेत.

ही चिंता फक्त पर्यावरणतज्ज्ञांची नाही तर ती प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याला नुकसान करते. आपण घेतलेला श्वास, पिण्याचे पाणी, उगवलेले अन्न सगळेच प्रदूषणाच्या परिणामांपासून सुटत नाही. मात्र प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे हे आपल्या हातात असते.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवसाचे महत्व –

२ डिसेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक वेदनादायी आठवण घेऊन येतो. १९८४ मध्ये झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेत हजारो लोकांनी क्षणात जीव गमावला. रात्रीच्या शांत हवेत पसरलेला विषारी वायू अनेक घरांवर मृत्यूच्या रूपात उतरला. या दुर्घटनेने आपल्याला शिकवले की, उद्योग, विकास आणि प्रगती या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे मानवी जीवन आणि सुरक्षितता. या घटना स्मरणात ठेवून, भविष्यात असे संकट पुन्हा कधीच येऊ नये म्हणून हा दिवस प्रदूषण नियंत्रणाच्या प्रत्यक्ष कामाला समर्पित केला जातो.

प्रदूषण म्हणजे काय?

प्रदूषण म्हणजे आपल्या वातावरणात असे घटक मिसळणे जे निसर्गाच्या संतुलनाला धक्का देतात आणि जिवांना हानी पोहोचवतात. हे घटक नैसर्गिकही असू शकतात, पण बहुतेक वेळा ते मानवी कृतींमुळे निर्माण होतात. हवेत, पाण्यात किंवा मातीत कुठेही हे अनाहूत घुसखोर शिरले की निसर्गाच्या शांत लयीत व्यत्यय येतो.

हवेतील धूर, पाण्यातील रासायनिक कचरा, मातीत मिसळलेले प्लास्टिक, कानांना त्रास देणारा प्रचंड आवाज हे सगळे मिळून आपल्या आजूबाजूच्या जीवनाला अस्वस्थ करतात. हे फक्त निसर्गाचं नुकसान नाही तर हा आपल्या आरोग्यावर, समाजावर आणि भविष्यातील पिढ्यांवरही परिणाम करणारा घटक आहे.

प्रदूषणाचे प्रमुख प्रकार –

१. हवेचे प्रदूषण

धूर, विषारी वायू, वाहनांचे उत्सर्जन, कचरा व जाळणी हे हवेचे आरोग्य बिघडवतात.
परिणाम: दमा, हृदयविकार, डोळ्यांचे त्रास, फुफ्फुसांचे आजार.

२. पाण्याचे प्रदूषण

औद्योगिक रसायने, प्लास्टिक, नाले, रासायनिक शेतीचे पाणी नद्यांना विषारी करतात.
परिणाम: दूषित पाणी, पचनाचे आजार, जैवविविधतेचा नाश.

३. मृदेचे प्रदूषण

रासायनिक खते, प्लास्टिक, घातक कचरा हे मातीची सुपीकता कमी करतात.
परिणाम: शेती उत्पादन घटते, अन्नसाखळी बिघडते.

४. ध्वनी प्रदूषण

जोरात वाजणारे हॉर्न, मशिनरी, फटाके हे मानसिक शांततेला भेगा पाडतात.
परिणाम: चिडचिड, झोपेच्या समस्या, हृदयावर ताण.

प्रदूषण नियंत्रणात आणणे हे आपल्या हातात आहे. कधी कधी उपाय मोठे नसतात ते आपल्या छोट्याशा सवयींमध्ये दडलेले असतात. वाहन कमी वापरणे, शक्य असेल तेव्हा सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे. प्लास्टिकचा वापर टाळणे, कचरा वेगळा करून देणे, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन, ऊर्जेची बचत, पाण्याचा अपव्यय कमी करणे, इमारती व उद्योगांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन या सर्व गोष्टींच योग्य वापर केला तर नक्की प्रदूषणवर नियंत्रण मिळवता येणार आहे .

पर्यावरण हा विरोधक नाही तर तो आपल्या अस्तित्वाचा आधारस्तंभ आहे. प्रदूषण कमी करणे म्हणजे निसर्गाला पुन्हा श्वास देणे. औद्योगिक विकासही आवश्यक आहे, पण तो जबाबदारीसह असावा. स्वच्छ ऊर्जा, हरित तंत्रज्ञान, सुरक्षित प्रथांसह भारत स्वच्छ आणि सुरक्षित भविष्यासाठी प्रवास करू शकतो.

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा फक्त एक दिवस नाही तर तो चेतावणीही आहे आणि संधीही. चूक झाल्यावर पश्चात्ताप पुरेसा नसतो त्या चुका पुन्हा होऊ नयेत याची काळजी घेणे खरी जबाबदारी आहे. निसर्गाला जपणे म्हणजे स्वतःला जपणे. आज केलेले प्रत्येक छोटे पाऊल उद्याच्या श्वासात चांदण्यासारखी स्वच्छता मिसळू शकते. त्यामुळे आपले आरोग्य आपल्या हातात आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे.

 

* आकांक्षा देशमुख
* ⁠संवाद सेतू

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.