मराठी नाट्यकलेचा सांस्कृतिक वारसा जपणारा मराठी रंगभूमी दिन !
महाराष्ट्र राज्यात मराठी रंगभूमी दिनाला मोठे महत्व आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्यात मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. या दिवशी कलाकार, नाट्यकर्मी आपली कला सादर करत हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करतात.
मराठी रंगभूमी दिन दरवर्षी ५ नोव्हेंबरला साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्रातील रंगभूमी आणि नाट्यकलेच्या क्षेत्रातील कलाकार, नाट्यकर्मी, तसेच रसिक प्रेक्षकांसाठी अत्यंत विशेष आहे. तसेच मराठी नाटकांच्या सांस्कृतिक परंपरेला, त्यांच्या अभूतपूर्व योगदानाला आणि नाट्यकलेचा विकास घडवून आणणाऱ्या महान कलाकारांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्याचा हा दिवस असतो.
रंगभूमी दिनाचे महत्त्व हे खूप वेगळे आहे. ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी मराठी रंगभूमीच्या उगमाचा दिवस म्हणून तो मानला जातो. या दिवशी विविध ठिकाणी नाट्य महोत्सवांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये विविध पारंपरिक, आधुनिक तसेच प्रायोगिक नाटके सादर केली जातात. मराठी रंगभूमी दिनाचे साजरीकरण सध्या वेगळ्या पद्धतीने सुरू केले जात आहे. आजच्या काळात, मराठी रंगभूमीला अधिकाधिक पुढे नेण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमांचा वापर सुरू आहे.
मराठी रंगभूमीचा इतिहास आणि विकास आजही आठवला जातो. मराठी रंगभूमीचा इतिहास १८व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला असून आजही अंगावर काटे आणणारा इतिहास म्हणून ओळखला जात आहे. गोविंद बल्लाळ देवल, बाल गंधर्व, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांसारख्या कलाकारांनी मराठी रंगभूमीला असामान्य उंचीवर नेले. देशभक्ती, सामाजिक सुधारणांची गरज, स्त्री-पुरुष समानता अशा अनेक विषयांवर नाटकांतून जनजागृती केली गेली.
मराठी नाटकांची खासियत आजही तेवढीचं आहे. मराठी नाटकांमध्ये वास्तववादी विषयांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. काही काळानंतर येणाऱ्या नव्या पिढ्यांनी नवनवीन नाट्यप्रयोग आणि संकल्पना आणून मराठी रंगभूमीला एक नवे रूप व ओळख दिली. महाराष्ट्रातील विविध समाजश्रेणींतील कथा, त्यांच्या समस्या, त्यांचे जीवन आणि भावविश्व याचे प्रत्यक्ष दर्शन नाटकांतून घडते.
मराठी रंगभूमी दिन आपल्याला आपल्या समृद्ध नाट्यकलेचा वारसा जतन करण्यास, कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित करतो. या दिवशी आपण मराठी रंगभूमीला सलाम करतो. परंतु, सध्याच्या जगात मूळ रंगमंचीय अनुभव जपणे हे आव्हानात्मक आहे. म्हणूनच, रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नव्या पिढीला रंगभूमीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची जाणिव करून देणेही तेवढेचं गरजेचे आहे.