Samvad Setu Media

[gtranslate]

The legacy of Shiv Sena supremo Bal Thackeray, the tiger of Marathi resurgence

The legacy of Shiv Sena supremo Bal Thackeray, the tiger of Marathi resurgence

bal thackrey

Bal Thackeray’s 13th death anniversary !

महाराष्ट्रावर हक्क फक्त मराठी माणसाचाचं.., हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची झंझावात राजकीय कारकीर्द !

महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्थित्व टिकवणारे, मराठी माणसासाठी लढणारे, महाराष्ट्र हा मराठी माणसाचाचं आहे हे ठणकावून सांगणारे, तब्बल चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणाला आपल्या इशाऱ्यांवर चालवणारे एकमेव नेते म्हणजे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…,

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज १३ वी पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी १७ नोव्हेंबरला २०१२ ला वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. बाळासाहेबांची प्रतिमा कट्टर हिंदू नेते अशी राहिली. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती. बाळासाहेबांनी राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार अनुभवले. चला तर मग बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया.

कोण होते बाळासाहेब ठाकरे ?

शिवसेना संस्थापक ‘बाळासाहेब केशव ठाकरे’ यांचा १३ वा स्मृती दिन आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार होते व सामना या वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक आणि एक राजकिय नेते होते. बाळासाहेब ठाकरे आपल्या व्यंगचित्रातून राजकीय-सामाजिक प्रश्नांवर भाष्य करायचे. 1966 साली बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या मते ‘समाजसुधारकांची समृद्धी, परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागे राहिला आहे, महाराष्ट्रात सुविधा आहेत पण मराठी माणूस दुविधेत आहेत, आपल्याकडे उद्योग आहे पण मराठी तरूण बेरोजगार आहे, पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. देशात महाराष्ट्राला मान आहे. परंतु, महाराष्ट्रातल्याच मुंबईत मराठी माणूस अपमानित होतो आहे म्हणून साहेबांनी शिवसेना स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

बाळासाहेब ठाकरेंचे स्मृतीस्थळ –

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी मातोश्री निवासस्थानी मृत्यू झाला होता. त्यामुळे बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्कमधील जागेत त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. या स्मृतीस्थळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह इतर मंत्री, शिवसेना नेते आणि शिवसैनिक व हितचिंतक आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त या स्मृतीस्थळाला लाखो चाहते भेट देतात. तर १७ नोव्हेंबर म्हणजेच बाळासाहेबांची पुण्यतिथी असून यानिमित्ताने स्मृतीस्थळ विविध शोभिवंत झाडांच्या फुलांनी सजवण्यात येते.

शिवसेना पक्षाची स्थापन –

१९६६ मध्ये त्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला. त्यांची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी १९८९ मध्ये ‘सामना’ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मुंबईत सर्वत्र शांतता पसरली यावरून त्यांच्या राजकीय उंचीचा अंदाज लावता येतो. अंत्यसंस्काराच्या दिवशीही परिस्थिती तशीच राहिली. अंतयात्रेत दोन लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. रस्ते रिकामे होते आणि वाहनांची ये-जा नगण्य होती. तो दिवस आठवताच बाळासाहेबांच्या चाहत्यांना आजही गहिवरून येते.

व्यंगचित्रकार प्रवास –

२३ जानेवारी १९२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या बाळासाहेबांनी पत्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.’द फ्री प्रेस जर्नल’मधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये त्यांची व्यंगचित्रेही प्रसिद्ध झाली. १९६० मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली आणि ‘मार्मिक’ नावाने स्वतःचे राजकीय मासिक सुरू केले. वास्तविक, बाळासाहेबांवर वडिलांच्या विचारसरणीचा प्रभाव होता.

बाळासाहेबांचा विरोध –

यूपी-बिहारमधून येऊन मुंबईत स्थायिक होणाऱ्या लोकांच्या, नेत्यांच्या आणि अभिनेत्यांच्या विरोधात बाळासाहेब होते. महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचा आहे असे ते म्हणायचे. महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांच्या वाढत्या प्रभावाविरुद्ध त्यांनी आंदोलन केले. ते महाराष्ट्राचे किंग मेकर होते. सरकारमध्ये नसतानाही त्यांनी सर्व निर्णय घेतले. म्हणून आजही लोक त्यांनी मराठी माणसाची अस्मिता म्हणून ओळखतात.

बाळासाहेबांची भाषणं-

आपल्या कुंचल्यांच्या फटकाऱ्याने आणि भाषणातील शाब्दिक बाणाने विरोधकांना घायाळ करणारे अन् प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हिंदुत्वाची ज्वाला पेटवणारे अखंड भारताचे लाडके वक्ते, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जातं असे सर्वांचे लाडके हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. बाळासाहेब हे एक राजकीय नेतेच नव्हते तर उत्तम वक्ते देखील होते.

बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांची खासियत म्हणजे हातात कोणताही कागद न घेता ते बोलायचे. त्यांची तोफ अशी धडायची की विरोधक घायाळ अन् त्यांना ऐकणारा प्रत्येक जण मंत्रमुग्ध व्हायचा. बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे म्हणजे शिवसैनिकांसाठी जणू पर्वणी असायची. ते एखाद्याच्या विरोधात बोलायला लागले की शत्रूसारखेच वाटायचे, मात्र जेव्हा ते एखाद्याची स्तुती करत तेव्हा त्यांच्यापेक्षा मोठा कोणी मित्रच नाही, असा भाव तयार व्हायचा

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काही गोष्टी –

– बाळासाहेब ठाकरे यांना चांदीच्या सिंहासनावर बसण्याची आवड होती. त्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर फक्त त्यांचे शिवसैनिकच नव्हेतर विरोधकही गर्दी करायचे. 

– बाळासाहेब ठाकरे हे असे व्यक्तिमत्व होते, जे कधीही कोणाला भेटायला गेले नाहीत. ज्याला भेटायचे आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचायचा. त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर स्वतः त्यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पोहोचत असतं.

– 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करण्यास आणि निवडणूक लढविण्यास 6 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यांनी आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात त्यांची भूमिका आणि त्यांचा आदेश हा अंतिम मानला जायचा. 

– प्रत्येकाने छंद जोपासावेत असं बाळासाहेब म्हणायचे.  त्यांना सिगार आणि व्हाईट वाईनची आवड होती. त्यांच्या अनेक मुलाखती आणि फोटोंमध्ये त्यांच्या हातात सिगार दिसतो.


बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूला अनेक वर्ष लोटली तरी आजही  देशाच्या अन् राज्याच्या राजकारणात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या तोंडातून सुटलेला शब्द हा भात्यातील बाणाप्रमाणे असतो, तो एकदा सुटला की सुटला, अशा अत्यंत कडक अन् रोखठोक स्वभावाच्या बाळासाहेबांची राजकीय कारकीर्द अत्यंत वादळी राहिली. आज बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये नाही मात्र त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान आणि त्यांचा आक्रमक स्वभाव, त्यांची आठवण आजही महाराष्ट्रातील मराठी माणूस काढत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

Let’s Build Something Impactful Together

At Samvad Setu Media, we bridge ideas and audiences through strategy,
creativity, and communication that deliver real results.
Partner with us to amplify your message and create lasting influence.