दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित Ranpati Shivaray चा प्रीमियर सोहळा काल मोठ्या थाटात संपन्न झाला.
मराठी सिनेमा जेव्हा इतिहासाकडे पाहतो, तेव्हा तो केवळ भूतकाळ दाखवत नाही, तर वर्तमानाला दिशा देतो आणि भविष्यासाठी प्रेरणा देतो. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित “Ranpati Shivaray” हा चित्रपट म्हणजे याच प्रेरणेचा, शौर्याचा आणि स्वराज्यनिष्ठेचा भव्य आविष्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या पर्वावर आधारित हा चित्रपट केवळ एक ऐतिहासिक कथा नसून, तो स्वराज्याच्या विचारांची, नेतृत्वाच्या मूल्यांची आणि रणधर्माची सशक्त मांडणी करतो.

शिवाजमहाराजांची आग्रा भेट, त्यानंतर महाराजांना झालेली नजर कैद आणि औरंगजेब बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटलेले शिवाजी महाराज ही गोष्ट प्रत्येक शिवप्रेमीला माहीत असेलच. याच गोष्टीची चित्तथरारक कथा म्हणजे दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित मराठी चित्रपट Ranpati Shivaray. कथा माहीत असूनही चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. अचूक स्क्रिप्ट, योग्य कास्टिंग आणि उकृष्ट दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट मराठीतील उत्तम चित्रपटांच्या यादीत विराजमान झालाय.
२०१८ ला या शिव अष्टकाची घोषणा झाली. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज ,सुभेदार आणि आता सहावं पुष्प म्हणजे Ranpati Shivaray..! या चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, सचिन एस. देशपांडे, ऋषी सक्सेना आणि दिग्पाल लांजेकर एवढ्या मोठ्या स्टार कास्ट ने काम केलंय. ‘Ranpati Shivaray – आग्रा भेट ची घोषणा ऑक्टोबर २०२५ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आली होती. हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. पण आलेल्या राजकीय दुखवट्यामुळे आता हा चित्रपट ६ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Ranapati Shivaray चित्रपटाचा ट्रेलर बघितला का?
काय आहे Ranpati Shivaray चित्रपट..!
चित्रपटाची सुरुवात महाराजांच्या हेर खात्याचं आग्रा मध्ये चालू असणाऱ्या स्टिंग ऑपरेशन वरून होतं. आणि हेच या चित्रपटाचं वैशिष्ठ आहे. Ranpati Shivaray आग्रा स्वारी हे नाव ऐकताच चित्रपट नक्की कशाबद्दल आहे आणि यात काय दाखवलं असणार याचा आंदाज प्रत्येकाला होताच. पण दिग्पाल लांजेकरांनी आपण विचार न केलेल्या गोष्टी सुद्धा यात मांडल्या आहेत. यामुळे महाराजांच्या दूरदृष्टी, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन या गुणांची प्रचिती येते.

आपण आत्तापर्यंत ऐकलंय की महाराज औरंगजेबाच्या भेटीला आग्रा मध्ये येतात. तिथे औरंगजेब महाराजांना कैद करतो. आणि मग महाराज प्लॅनिंग करून तिथून निसटतात. पण महाराजांची ही प्लॅनिंग आग्रा मध्ये येण्याआधीपासून सुरु होती. महाराज आग्रा मध्ये येण्याआधी जवळ जवळ एक वर्ष आधी कसं महाराजांचं हेर खातं बहिर्जी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ऍक्टिव्ह होतं हे या चित्रपटात पहायला मिळालं. या चित्रपटाची दुसरी महत्वाची बाजू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं बापाचं मन आणि राजमाता जिजाऊ यांचं आईचं मन ही बाजू प्रकर्षाने दाखवली गेलीये. आत्तापर्यंत आपण नेहमी कणखर, कधीही न डगमगणारे शिवाजी महाराज आणि नेहमी खंबीर असणाऱ्या जिजामाता ऐकल्यात, वाचल्यात पण जेव्हा संकट आपल्या मुलावर येतं तेव्हा बापाचे आण आईचे डोळे मायेने ओले होतातच याची जाणीव हा चित्रपट पाहिल्यानंतर होतेय.
एकूणच चित्रपट खूप छान झालाय. सर्वांनी खूप छान काम केलंय. चिन्मय मांडलेकर नंतर कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र आपल्या अभिनयाने अभिजीत श्वेतचंद्र याने सर्वांना या प्रश्नाचं उत्तर दिलंय. त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय दिलाय असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाचं खास आकर्षण ठरले ते म्हणजे बाल कलाकार. शंभु राजे, येसूबाई यांची भूमिका करणारे बाल कलाकार मनात घर करुन जातात.
दर्याभवानी २०२७
Ranpati Shivaray या चित्रपटाच्या शेवटी दर्याभवनी या पुढील चित्रपटाची घोषणा सुद्धा करण्यात आली. त्यामुळे अगदी एका वर्षात या शिव अष्टकामधलं सातवं फुल माळलं जाणार आहे. दर्याभवानी या नावावरूनच हा चित्रपट महाराजांच्या सागरी मोहिमा आणि आरमार यांवर असणार हे स्पष्ट आहे. हा असा विषय आहे की ज्याबद्दल शाळेत मोजकचं शिकवलं गेलंय. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
फर्जंद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोंढाणा मोहिमेतील पराक्रमी मावळा कोंडाजी फर्जंद यांच्या शौर्यकथेवर आधारित चित्रपट. मराठ्यांच्या गनिमी काव्याची ताकद, निष्ठा आणि स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान या चित्रपटात प्रभावीपणे मांडलं आहे.
फत्तेशिकस्त
औरंगजेबाचा सरदार शायस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी केलेल्या धाडसी हल्ल्याची थरारक कथा. रणनीती, बुद्धिचातुर्य आणि मराठ्यांचा आत्मविश्वास या सगळ्यांचं जबरदस्त दर्शन घडवणारा सिनेमा म्हणजे फतेशिकस्त.

पावनखिंड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेसाठी बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी दिलेल्या ऐतिहासिक बलिदानाची अमर गाथा. स्वराज्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांची कहाणी प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडते.
शेर शिवराज
अफजलखान वध या ऐतिहासिक प्रसंगावर आधारित चित्रपट. शिवाजी महाराजांचा धैर्य, राजकारण, संयम आणि शौर्य यांचा प्रभावी संगम दाखवणारी ही कथा मराठी स्वाभिमान जागवते.
सुभेदार
मराठा साम्राज्यातील निष्ठावान आणि पराक्रमी सेनानी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्य आणि बलिदानाची कथा. कोंढाण्यावर स्वराज्याचा भगवा फडकवण्यासाठी दिलेला संघर्ष आणि त्याग या चित्रपटाचा आत्मा आहे.
महाराजांच्या आग्रा भेटीचा चित्तथरारक अनुभव सगळ्यांनी थिएटर मध्ये जाऊन नक्की अनुभवा..! बाहेर पडताना तुमची छाती अभिमानाने नक्की भरुन येईल आणि मुखी एकच गर्जना असेल छत्रपती शिवाजी महाराज की, जय..! जय भवानी, जय शिवाजी..! हर हर महादेव..! चित्रपटाला संवाद सेतूकडून शुभेच्छा..!