भारतीय बॅडमिंटनला जागतिक ओळख देणाऱ्या प्रवासाचा गौरवशाली शेवट होत आहे..!
सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व काही क्षणातच डोळ्यांसमोर उभं राहिलं जेव्हा २० जानेवारीला सायना नेहवालने निवृत्तीची घोषणा केली. हा प्रवास म्हणजे केवळ एका खेळाडूचा नव्हता, तर तो स्वप्न पाहणाऱ्या, लढणाऱ्या आणि जिद्दीने उभ्या राहणाऱ्या लाखो मुलींचा प्रवास होता. बॅडमिंटन हा खेळ भारतात घराघरात पोहोचवण्याचं काम ज्या एका नावाने केलं, ते नाव म्हणजे सायना नेहवाल. बॅडमिंटन बघायला, खेळायला आणि त्यावर विश्वास ठेवायला लावणारा तो काळ खरंच सायनाचा काळ होता, आणि म्हणून त्याला सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
एकेकाळी क्रिकेटपुरतंच मर्यादित असलेलं भारतीय क्रीडाजगत सायनामुळे बॅडमिंटनकडे वळलं. टीव्हीसमोर बसून बॅडमिंटनची मॅच पाहणं, रॅकेट हातात घेऊन मैदानाकडे धावणं आणि “आपणही सायनासारखं काहीतरी करू शकतो” हा आत्मविश्वास निर्माण करणारी ती एकमेव खेळाडू होती. तिचा प्रत्येक विजय हा केवळ गुणफलकावरचा विजय नव्हता, तर तो भारताच्या आत्मविश्वासाचा विजय होता.
सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व..!

ऑलिम्पिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारी, तसेच जागतिक ज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला ठरली. त्याचबरोबर ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला हा मानही तिने मिळवला. त्या क्षणी भारताच्या प्रत्येक घरात अभिमानाची भावना दाटून आली होती. हा केवळ सायनाचा विजय नव्हता, तर तो संपूर्ण देशाचा, प्रत्येक संघर्ष करणाऱ्या मुलीचा विजय होता. असं होतं सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व..! या सुवर्ण पर्वाचं आपल्याला साक्षीदार होता आलं हेच आपलं भाग्य.
Olympic में जीत पर क्या बोलीं Saina Nehwal?
सायनाच्या या देदीप्यमान कामगिरीची दखल घेत तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हे पुरस्कार म्हणजे फक्त सन्मानच नाहीत, तर तिच्या अपार मेहनतीची, दुखापतींवर मात करण्याच्या जिद्दीची, अपयशातून उभं राहण्याच्या ताकदीची आणि अखंड संघर्षाची पावती आहेत. अनेकदा दुखापती, टीका, अपयश यांचा सामना करतानाही सायनाने कधी हार मानली नाही. तिची लढाऊ वृत्ती हीच तिची खरी ओळख होती.
सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व म्हणजे आईच्या स्वप्नांना दिलेलं बळ..!
पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या आपल्या देशात सायनाने मात्र आईच्या स्वप्नांना बळ द्यायचं ठरवलं. तिची आई स्वतः राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू होती. आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न सायनाने केवळ पूर्णच केलं नाही, तर ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेऊन इतिहास घडवला. आपल्या देशात जिथे आजही अनेक मुलींची स्वप्नं परिस्थिती, समाज आणि मर्यादांमुळे खुंटतात, तिथे सायनाने स्त्रीशक्तीचा आवाज बुलंद केला.

पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्रीडा क्षेत्रात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. “मुलीही करू शकतात” हे केवळ सांगितलं नाही, तर करून दाखवलं. त्यामुळेच आज देशभरात हजारो मुली रॅकेट हातात घेऊन कोर्टवर उतरतात, स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी झगडतात. त्या प्रत्येक स्वप्नामागे कुठेतरी सायनाची प्रेरणा आहे. त्यामुळे बॅडमिंटन खेळणारी प्रत्येक मुलगी मध्ये आपल्याला सायना बघायला मिळते.
सायनाचा प्रवास हा केवळ विजयानं भरलेला नव्हता, तर तो संघर्ष, संयम आणि सातत्याचा आदर्श होता. दुखापतींमुळे मैदानाबाहेर राहण्याची वेळ आली, जागतिक क्रमवारीत घसरण झाली, टीकेचे बाण झेलावे लागले, तरीही सायनाने कधीच आपली मान खाली घातली नाही. अपयश आलं, तेव्हा तिने त्याला स्वीकारलं; आणि यश आलं, तेव्हा त्याचा गर्व केला नाही. हाच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठेपणा होता. आजच्या वेगवान काळात जिथे यश पटकन हवं असतं, तिथे सायनाने संयमाने वाट चालत यश मिळवून दाखवलं. तिच्या कारकिर्दीने एक गोष्ट ठामपणे शिकवली स्वप्न मोठी असतील, तर त्यासाठीची लढाईही मोठी असावी लागते. म्हणूनच सायनाची कहाणी ही केवळ बॅडमिंटनची नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठीची प्रेरणादायी जीवनकथा आहे. तिच्या स्वप्नांनी घडवलेलं हे सुवर्णपर्व पुढील अनेक पिढ्यांना नवी उमेद देत राहील यात काहीच शंका नाही.
निवृत्तीनंतरही सायना नेहवालचं योगदान संपणार नाही, अशी भावना संपूर्ण क्रीडाजगत व्यक्त करत आहे. प्रशिक्षक, मार्गदर्शक किंवा क्रीडा क्षेत्रातील इतर भूमिकांतून ती भारतीय बॅडमिंटनला नवी दिशा देईल, अशी आशा आहे. तिची निवृत्ती म्हणजे एका युगाचा शेवट असला, तरी तिने दाखवलेला मार्ग, उभं केलेलं स्वप्न आणि दिलेली प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी कायम प्रकाशस्तंभ ठरेल.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुमारे १५ पदकं आणि २४ टायटल्स जिंकून बॅडमिंटनमध्ये भारताची मान उंचावणाऱ्या, लाखो स्वप्नांना पंख देणाऱ्या सायना नेहवालला संवाद सेतूचा मानाचा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…! सायनाच्या स्वप्नांनी घडवलेले सुवर्णपर्व कायम लक्षात राहील.