शहापूरच्या ओंकार तारमळेची आयपीएलमध्ये ऐतिहासिक एन्ट्री; सनरायझर्स हैदराबादने ३० लाखांत केली खरेदी
भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या २०२६ हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक मोठे, अनुभवी आणि स्टार खेळाडू सहभागी झाले होते. मात्र याच लिलावात ग्रामीण आणि निमशहरी भागातून आलेल्या अनेक नवख्या खेळाडूंनाही मोठी संधी मिळाली. अशाच खेळाडूंमध्ये शहापूरच्या ओंकार तारमळेचे नाव ठळकपणे पुढे आलं आहे.
शहापूर तालुक्यातील ओंकार तारमळेची आयपीएलमध्ये निवड होणं ही केवळ त्याच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण शहापूरसाठी अभिमानाची बाब आहे. ओंकारला आयपीएल २०२६ साठी सनरायझर्स हैदराबाद या संघाने आपल्या संघात सामावून घेतलं आहे. विशेष म्हणजे, त्याची खरेदी ३० लाख रुपयांच्या मूळ किंमतीवर करण्यात आली आहे.
या आयपीएल लिलावात एकीकडे काही नामवंत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अनसोल्ड राहिले, तर दुसरीकडे अनेक अनकॅप्ड खेळाडूंवर संघांनी विश्वास दाखवला. काही अनकॅप्ड खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची बोली लागली, तर काही खेळाडूंना त्यांच्या मूळ किंमतीतच संधी देण्यात आली. ओंकार तारमळे हा देखील अशाच खेळाडूंमध्ये मोडतो, ज्याच्यावर सनरायझर्स हैदराबादने विश्वास टाकला आहे.
गोलंदाज म्हणून ओंकारची ओळख
ओंकार तारमळे हा एक गुणवान गोलंदाज आहे. स्थानिक आणि राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वेग, अचूकता आणि संयम या त्याच्या गोलंदाजीतील प्रमुख वैशिष्ट्यांमुळे निवड समिती आणि आयपीएल संघांचे लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं.
अवघ्या २३ व्या वर्षी आयपीएलचे स्वप्न पूर्ण
अवघ्या २३ व्या वर्षी ओंकारचं आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. लहान वयापासून क्रिकेटची आवड, कठोर मेहनत, नियमित सराव आणि कधीही हार न मानणारी जिद्द या जोरावर त्याने हा टप्पा गाठला आहे. अनेक अडचणी, आर्थिक मर्यादा आणि स्पर्धा असूनही ओंकारने क्रिकेट सोडलं नाही.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणा
ओंकार तारमळेची आयपीएलमधील निवड ही ग्रामीण भागातील अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता येतं, हे ओंकारने सिद्ध केलं आहे.
कुटुंबाला आनंद
ठाण्याची शहापूरमधील ओंकारला सनरायझर्स हैदराबादने (SunRisers Hyderabad) ३० लाखांच्या मूळ किंमतीत खरेदी केले आहे. त्याने आतापर्यंत अनेक स्तरावर आपले कौशल्य दाखवले आहे. तो त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी (Balling) ओळखला जातो. घरची बेताची परिस्थिती, मध्येच क्रिकेट सोडण्याचाही विचार होता. परंतु मोठ्या जिद्दीने काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा होती, असं ओंकारने सांगितलं.
वडिलांनी घेतले कर्ज-
ओंकारसाठी हा प्रवास सोपा नव्हता. परंतु त्याचे आईवडील त्याच्या पाठीशी खंबीरपणे सोबत होते. ओंकारच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडिलांनी लोनेदेखील घेतली आहे. ओंकार हा अनेक ठिकाणी जाऊन खेळला आहे. तो दिल्लीलादेखील गेला होता. मात्र, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. परंतु त्याला त्रिपुराला जायचे होते. यासाठी त्याच्या वडिलांनी तीन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर तो त्रिपुराला गेला.
ओंकारच्या वडिलांनी सांगितले की, त्याच्यासाठी महाराष्ट्र प्रिमियल लीग हे कलाटणी देणारे ठरले. त्यानंतर त्याला भरारी मिळाली. ओंकार महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि मुंबई प्रीमियर लीग खेळला आहे. तो सुरुवातीला टेनिस बॉलने खेळला.त्यानंतर लेदर बॉलकडे वळला. यानंतर त्याच्या दमदार कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधले.
आता आयपीएल २०२६ मध्ये ओंकार तारमळेची सनरायझर्स हैदराबादकडून मैदानात उतरतो का, आणि तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. शहापूरकरांसह संपूर्ण महाराष्ट्राला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
ओंकार तारमळेच्या या यशाबद्दल त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या या यशाने शहापूरचं नाव देशभरात पोहोचलं असून, त्याच्या पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी सर्वजण त्याला शुभेच्छा देत आहेत.