Mahaparinirvan Diwas ! why is it celebrated ?
जो समाज शिक्षणापासून दूर राहतो, तो प्रगतीपासूनही दूर राहतो; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार !
भारतीय समाजाला नवदिशा देणाऱ्या, समानतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्याचा दिवस म्हणजे ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन. प्रत्येक वर्षी हा दिवस आला की देशभरातील अनुयायी श्रद्धेने आणि कृतज्ञतेने बाबासाहेबांना आठवतात. १९५६ साली याच दिवशी त्यांनी देह ठेवला आणि म्हणूनच हा दिवस त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या स्मृतीने अधिक अर्थपूर्ण ठरतो.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन हा देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून ओळखला जातो. ६ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकरांचे निधन झाले होते. या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे जमतात. आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि ते बौद्ध गुरू मानले जातात, म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरला जातो.
चैत्यभूमी – प्रेरणेचे केंद्र
दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. हे ठिकाण आंबेडकरी चळवळीतील लोकांसाठी एक प्रकारचे प्रेरणास्थान झाले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात आणि बाबासाहेबांच्या कार्याची आठवण काढतात.
दरवर्षी १ डिसेंबरपासूनच देशभरातून लाखो भीमानुयायी चैत्यभूमीवर येण्यास सुरुवात करतात. २५ लाखांहून अधिक लोक येथे जमून आंबेडकरांच्या अस्थीकलश आणि प्रतिमेला अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहार, घरे, सार्वजनिक स्थळे, शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्येही बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले जाते. राजकीय नेतेही या स्मृतीस्थळांना भेट देऊन आदरांजली वाहतात.
संघर्षाचे आयुष्य आणि महान योगदान –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे सामाजिक न्याय आणि समानतेसाठी केलेला अखंड संघर्ष होता. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महाराष्ट्रातील ‘महू’ येथे एका अस्पृश्य कुटुंबात झाला. समाजात लहानपणापासून अनुभवलेल्या तीव्र जातीभेदांमुळे आणि भेदभावामुळे त्यांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रमुख शस्त्र मानले. त्यांनी परदेशातून उच्च शिक्षण (एम.ए., पी.एच.डी., डी.एस.सी., बार-ॲट-लॉ) घेऊन स्वतःची विद्वत्ता सिद्ध केली. शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी आयुष्यभर दलितांना, शोषित वर्गाला आणि स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढा दिला. त्यांनी ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ यांसारखी वृत्तपत्रे सुरू केली, तसेच ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची स्थापना केली. महाडचा सत्याग्रह आणि नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हे त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यातील महत्त्वाचे टप्पे ठरले.
धम्म स्वीकार –
डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातीभेदाच्या व्यवस्थेमुळे 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. या घटनेला भारतीय इतिहासात मोठे सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. धम्म स्वीकारल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीत निधन झाले. त्यांच्या निधनाचा दिवस हा त्यांच्या अनुयायांसाठी ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून अत्यंत आदराने आणि श्रद्धेने पाळला जातो. मुंबईतील चैत्यभूमी हे त्यांचे समाधीस्थळ आहे. येथे दरवर्षी 6 डिसेंबर रोजी लाखो अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जमतात.
डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा त्रिसूत्री मंत्र आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक आहे. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ हक्क मागायला शिकवले नाही, तर त्या हक्कांवर विश्वास ठेवण्यासाठी, आपल्या बुद्धीच्या आणि संघटनेच्या बळावर ते मिळवण्यासाठी लढायला शिकवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी देशाला अर्पण केलेले भारतीय संविधान आहे. हे संविधान केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार स्तंभांवर उभी असलेली भारताच्या लोकशाहीची पायाभरणी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आजही प्रेरणादायक आहे. त्यांचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. त्यांनी केवळ कायदेशीर अधिकार मिळवून दिले नाहीत, तर लोकांना स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची शिकवण दिली. महापरिनिर्वाण दिन हा केवळ त्यांच्या मृत्यूचा दिवस नाही, तर तो त्यांच्या समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना पुन्हा एकदा समर्पित होण्याचा दिवस आहे. त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.