पु. ल. देशपांडे : हसता हसता जगण्याची कला शिकवणारा व्यक्तिमत्त्व
एखादा माणूस जेव्हा हसतो, तेव्हा तो क्षणभर तरी आपल्या साऱ्या दुःखांवर मात करतो…आणि हेच हसणं, जगण्याचं सर्वात मोठं औषध आहे. हे औषध आपल्याला ज्यांनी दिलं, ते म्हणजेच आपले लाडके पु. ल. देशपांडे. विनोद, व्यंग, संगीत, साहित्य आणि माणुसकी यांचा सुंदर संगम असलेलं एक असामान्य व्यक्तिमत्त्व!
आज, ८ नोव्हेंबर, म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची जयंती. १९१९ साली मुंबईत जन्मलेल्या पुलंचं बालपण जोगेश्वरीतील सारस्वत कॉलनीत गेलं. पार्ले टिळक विद्यालयात त्यांचं शालेय शिक्षण झालं, तर पुढील शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडलं. मराठी साहित्य आणि संगीतातील योगदानाव्यतिरिक्त, पुलंचं कार्य आकाशवाणी, दूरदर्शन, सिनेमा आणि नाट्यक्षेत्र या सर्वच क्षेत्रांमध्ये लक्षणीय ठरलं.
मराठी साहित्यातील एक अजरामर बहुगुणी व्यक्तिमत्त्व म्हणजेच पु. ल. देशपांडे — सगळ्यांचे लाडके भाई! त्यांच्या हजरजबाबीपणामुळे, संवादफेकीमुळे आणि मराठी भाषेवरील अप्रतिम प्रभुत्वामुळे ते सर्वांच्या मनात घर करून राहिले. ‘धोंडो भिकाजी कडमडे जोशी’, ‘मंगेश साखरदांडे’, ‘बटाट्याच्या चाळीचे मालक’, ‘भाई’, ‘पुरुषराज अळूरपांडे’ अशी त्यांची अनेक टोपणनावे प्रसिद्ध होती..पुलंनी नाटक, चित्रपट, नभोवाणी आणि दूरदर्शन अशा सर्व क्षेत्रांत काम केलं. त्यामुळेच त्यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. १९९० साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवलं. त्याशिवाय पद्मश्री, साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पुण्यभूषण, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र गौरव, कालिदास सन्मान अशा असंख्य पुरस्कारांनी पुलंच्या कार्याला मान्यता मिळाली.
साहित्याचा सुवास
पुलंनी सांगितलेल्या कथा आणि त्यांची कथाकथनाची खास शैली यामुळे अनेक पिढ्या घडल्या. ‘‘नारायण’, ‘हरितात्या’, ‘पानवाला’, ‘म्हैस’, ‘रावसाहेब’, ‘पाळीव प्राणी’ या त्यांच्या व्यक्तिरेखा आजही मराठी वाचकांच्या मनात कोरल्या आहेत. ‘ती फुलराणी’, ‘वाऱ्यावरची वरात’, ‘बटाट्याची चाळ’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘असा मी असामी’ या कलाकृतींनी मराठी माणसाच्या मनात कायमचा ठसा उमटवला. पुलंच्या विनोदात उपहास नव्हता, तर माणसावरचं प्रेम होतं. त्यांनी विनोदात गंभीरतेचा गाभा गुंफला आणि माणसाच्या जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोन दिला.
पु. ल. देशपांडेंची अजरामर नाटक
पु. ल. देशपांडे यांनी अनेक लोकप्रिय नाटकं लिहिली आहेत. काही इंग्रजी नाटकांचे त्यांनी मराठीत ही भाषांतर केले आहे. १९४८ साली त्यांनी लिहिलेलं ‘तुका म्हणे आता’ हे पहिलं नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. यानंतर १९५२ साली आलेलं ‘अंमलदार’ नाटक गाजलं. तसंच ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘भाग्यवान’, ‘सुंदर मी होणार’ ही नाटकंही विशेष लोकप्रिय ठरली.
आजही जिवंत असलेली आठवण
२ जून २००० रोजी पुलं या जगातून निघून गेले, पण खरं सांगायचं तर ते गेलेच नाहीत. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात, संवादात आणि आपल्या मराठी माणसाच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्यात आजही पुलं जिवंत आहेत. त्यांचं आयुष्य म्हणजे प्रेरणादायी संदेश “जगणं जर गंभीरतेने करायचं असेल, तर थोडं विनोदात जगायला शिका!”
आज त्यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची आठवण जागी होते, आणि प्रत्येक ओठावर एकच वाक्य उमटतं, “अशा पुलंना पुन्हा जन्म मिळो!”