वंदे मातरम्…150 वर्षांचा भारताचा अभिमान असलेलं राष्ट्रीय गीत
वंदे मातरम्… अंगावर काटा आणणारे हे दोन शब्द नाही तर भारताच्या अभिमानाची आठवण करून देणारे प्रेरणादायी शब्द आहेत. वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाली. मात्र या शब्दांची थरथर आजही तशीच आहे. वंदे मातरम हे फक्त गीत नाही तर भारत मातेच्या एकतेचा संदेश देणार गीत आहे. यामध्ये एक वेदना, एक ज्वाला आणि एक नतमस्तक प्रणाम भारतमातेपुढे आहे.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली वंदे मातरम हे गीत कागदावर उतरवले होते. आज या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाली आहेत. भारत मातेचे स्मरण करणाऱ्या या गीताचे महत्व व इतिहास आपण पाहूया.
सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्, शस्यश्यामलाम् मातरम्… !
भारत देश पारतंत्र्यात असताना भारतीयांचा आत्मविश्वास हरवला होता. पण “वंदे मातरम्”च्या प्रत्येक ओळीने लोकांच्या मनात पुन्हा रक्त उसळायला लागलं. “आपली मातृभूमी जिवंत आहे आणि तिचं रक्षण करायचं ताकद आपल्या रक्तात आहे. हे या गीताने भारतीयांना आठवण करून दिली. 150 वर्षांत किती पिढ्या गेल्या, किती झेंडे फडकले, परिस्थिती बदलली पण या गीताचा एकही शब्द जुना झाला नाही.
Vande Mataram हे गीत कोणी व कधी लिहले –
* बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1870 च्या सुमारास रचलेलं ‘वंदे मातरम्’ हे गीत ‘आनंद मठ’ या कादंबरीत क्रांतिकारकांचं युद्धगीत म्हणून समाविष्ट केलं.
* 1905 च्या बंगाल फाळणीविरोधी आंदोलनात या गीतानं स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा दिली. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्येही हे गीत गायले जाऊ लागले.
* मातृभूमीला देवीच्या रूपात चित्रित करणाऱ्या या गीतानं भारतीय अस्मितेचा उद्घोष केला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या साहित्यकृतीनं तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत क्रांतिकारी बदल घडवले.
A symbol of national identity
भारत स्वातंत्र्यच्या इतिहासात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंद मठ’ या कादंबरीला आणि त्यातील ‘वंदे मातरम्’ या गीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 1882 मध्ये प्रकाशित झालेली ही बंगाली कादंबरी आणि त्यातील ‘वंदे मातरम्’ हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आजही ‘वंदे मातरम्’ ऐकताना प्रत्येक भारतीयांच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते.
State Government नियोजन
वंदे मातरम् या भारतमातेच्या स्तुतीगीताला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानं राज्यभरात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. ‘वंदे मातरम्’ गीतगायन, देशभक्तीपर भाषणं, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन आणि अन्य सास्कृतिक कार्यक्रमांची यावेळी मांदियाळी असेल. महत्वाचे म्हणजे शाळा, महाविद्यालयं आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्यापक कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्याशिवाय विविध संस्था आणि संघटना, सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही कार्यक्रमाचे आयोजन. ‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं असून त्यासंदर्भात 6 शासकीय आणि 7 अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आलीय.
आधुनिक काळातील Importance and role
आजही, ‘वंदे मातरम्’ गीत शाळेत गायले जाते आणि ते राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. हे गीत आजही राष्ट्रवादाची भावना आणि मातृभूमीबद्दल आदर व्यक्त करते. २०२५ मध्ये या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने देशभरात उत्सव साजरे करण्यास मान्यता दिली आहे.
हे गीत स्वातंत्र्य संग्रामातील एक जाज्वल्य प्रतीक बनले आणि भारतीयांना प्रेरणा देत राहिले. १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीनंतर ‘वंदे मातरम्’ चळवळ सुरू झाली, ज्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रीय चेतना जागृत झाली.
परदेशातील भारतीय क्रांतिकारकांवर परिणाम
* १९०७ मध्ये, मॅडम भिकाजी कामा यांनी बर्लिनमधील स्टुटगार्ट येथे भारताबाहेर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकवला. ध्वजावर वंदे मातरम हे शब्द लिहिलेले होते.
* १७ ऑगस्ट १९०९ रोजी, जेव्हा मदनलाल धिग्न्रा यांना इंग्लंडमध्ये फाशी देण्यात आली, तेव्हा फाशीच्या तख्तावर जाण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द “बंदे मातरम्” होते.
* १९०९ मध्ये, पॅरिसमधील भारतीय देशभक्तांनी जिनेव्हा येथून बंदे मातरम नावाचे मासिक प्रकाशित करण्याचे काम हाती घेतले.
* ऑक्टोबर १९१२ मध्ये, जेव्हा गोपाळ कृष्ण गोखले दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे आले, तेव्हा त्यांचे स्वागत ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने एका भव्य मिरवणुकीने करण्यात आले.
संविधान सभेत जन गण मन आणि वंदे मातरम हे दोन्ही राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारण्यावर पूर्ण एकमत होते आणि या मुद्द्यावर कोणताही वादविवाद झाला नाही. २४ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेला संबोधित करताना म्हटले की, स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे वंदे मातरमला राष्ट्रगीत, जन गण मन सारखाच दर्जा मिळाला पाहिजे आणि त्याचा समान सन्मान केला पाहिजे.
त्यांच्या विधानाचा स्वीकार करण्यात आला, रवींद्रनाथ टागोरांचे जन-गण-मन हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले आणि बंकिम यांचे वंदे मातरम हे जन-गण-मनाच्या समान दर्जासह राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले.
देशाची अस्मिता व अभिमान म्हणजे “वंदे मातरम्”.
सैनिकाची रक्ताळलेली माती पाहून त्या मातेनं घेतलेला श्वास म्हणजे “वंदे मातरम्”.
राष्ट्रध्वज वाऱ्यात फडफडताना दिसतो, तेव्हा त्या तिरंग्यामधील भाव म्हणजे “वंदे मातरम्!”
हे एक गाण नाही तर देशभक्तीची भावना आहे. भारत देशाचा अभिमान आहे. 150 वर्षांपूर्वी लिहिलेलं गाणं आजही आपल्याला भावनिक करून जातं. कारण त्यात भक्ती, वेदना आणि प्रेम आहे. वंदे मातरम् !
आकांक्षा देशमुख
संवाद सेतू